बारामती | विजय लकडे
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी, २२ जून रोजी पार पडलेल्या मतदानानंतर आज २४ जून रोजी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. बारामती येथील प्रशासकीय भवनात ही प्रक्रिया सुरु असून, सुरुवातीच्या टप्प्यात मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.
ब वर्गातून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी या मतदारसंघात एकतर्फी वर्चस्व दाखवत १०१ पैकी तब्बल ९१ मते मिळवत विजय मिळवला आहे. हा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं.
दरम्यान, अजितदादांच्या ‘निळकंठेश्वर’ पॅनलनेही आघाडी घेतल्याचं चित्र समोर येत आहे. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून रतनकुमार भोसले आणि इतर मागास प्रवर्गातून नितीन शेंडे हे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. त्यामुळे पुढील निकालावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.
या निवडणुकीत एकूण १७,२९६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दरवेळीप्रमाणे यंदाही माळेगाव कारखाना निवडणूक स्थानिक राजकारणात व प्रदेशाच्या सहकार क्षेत्रात महत्त्वाची मानली जात आहे. अजित पवारांचा विजय आणि त्यांच्या पॅनलची आघाडी ही राजकीयदृष्ट्या निर्णायक मानली जात आहे.
0 Comments